पुणे – शिवाजीनगर पाठोपाठ आता स्वारगेट एसटी आगारातून ई-शिवाई बस सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातून शिवाजीनगर आगारातून नाशिकसाठी १६ ई-शिवाई बस १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. दर एक तासाला शिवाजीनगर येथून ई-शिवाई बस सुरू होती. पण, स्वारगेट येथून नाशिकला ई-शिवाई बस सुरू करावी, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुणे एसटी विभागाने पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान शिवाजीनगर येथून सुटणाऱ्या ई-शिवाई बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरूवात केली आहे. त्या बस स्वारगेट येथून सुटल्यानंतर शिवाजीनगर आगार येथून प्रवाशांना घेऊन जातील.. पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान एका तासाला स्वारगेट येथून बस सुटणार आहेत.
पुण्यातून चार शहरांसाठी ई-शिवाई
पुणे विभागातून चार शहरांसाठी ई-शिवाई बस सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे ई-शिवाईची सेवा सुरू आहे. पुणे विभागातून साधारण २० ई-शिवाई सोडल्या जात आहेत. तर, त्या चार शहरातून पुण्यासाठी २० ई-शिवाई येतात. तसेच, स्वारगेट व पुणे स्टेशन येथून मुंबईसाठी ६६ ई-शिवनेरी धावत आहेत.