शिरूर -शिरूर तालुक्यात वाढती करोना बाधितांची संख्या लक्षात घेता शिरूर शहरासह तालुक्यातील हॉटस्पॉट असणाऱ्या 15 गावात आठवडे बाजार, हातगाडी, फेरीवाले यांना पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार लैला शेख यांनी दिली.
तालुक्यातील शिरूर शहरासह तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ, न्हावरे, कोरेगाव भीमा, वढू बुद्रूक, सणसवाडी, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, मांडवगण फराटा, निमोणे, शिरूर नगरपरिषद, ग्रामीण शिरूर, सरदवाडी, कारेगाव या गावातील आठवडे बाजार व फेरीवाले यांना पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. याबाबत तात्काळ प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे. अशा अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुदीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये हा आदेश जारी केला आहे.
तसेच प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांना, नगरपरिषद मुख्याधिकारी यांना शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी आदेश जारी केले असून या देशाच्या सर्वांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरूर शहरात सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या इतर दुकानांवर या प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. शिरूर नगरपरिषद व गावातील तलाठी, ग्रामसेवक मंडलाधिकारी यांना याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असोही तहसीलदार शेख यांनी सांगितले.