राजगुरूनगर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पणाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त राजगुरूनगर सहकारी बँकेने श्रीरामआवर्त ठेव योजना सुरू केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची आठवण राजगुरूनगर सहकारी बँकेच्या सभासदांमध्ये राहावी, यासाठी बँकेने ’श्रीराम आवर्त ठेव’ योजना सुरू केली आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत या योजनेला मान्यता देण्यात आली.
त्यासाठी बँकेने 7.75 टक्के हा विशेष व्याजदर जाहीर केला आहे. या आवर्त ठेवीचा कालावधी 60 महिने ठेवण्यात आला आहे. या योजनेत मासिक रक्कम 700 रूपयांच्या पटीत ठेवता येणार आहे. ही योजना 22 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 एवढ्याच कालावधीसाठी आहे. या ठेव खात्यालही ठेवी संबंधित अटी शर्ती लागू असणार आहेत, असे ओसवाल म्हणाले.
पाच वर्षांत इेवीदार लखपती
या आवर्त ठेव योजनेनुसार जर 700 रूपये प्रति महिना खात्यात जमा केले, तर 5 वर्षांनी ठेवीदारास 51 हजार 362 रूपये मिळणार आहेत. तसेच 1400 प्रति महिना ठेवल्यास 1 लाख 2 हजार 724 रूपये मिळणार आहेत.
थोडक्यात 1400 रूपये प्रति महिना जमा केल्यास पाच वर्षांत ठेवीदार लखपती होणार आहे. या योजनेसाठी सध्याच्या परिस्थितीत तुलनात्मकदृष्ट्या आपण उत्तम व्याजदर देत आहोत. इच्छुक खातेदारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.
नावीन्यपूर्ण कर्जयोजना
बँकेने या वर्षी नाविन्यपूर्ण कर्ज योजनाही कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनांमध्ये शेतीपूरक कर्ज योजना असून त्याव्दारे जमीन सपाटीकरण, नवीन विहीर खोदाई, पाइपलाइन, विद्युत व सौर कृषीपंप, ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन, मळणी यंत्र, शेतमाल गोडाऊन, शीतगृह, गोठा बांधकाम इत्यादींकरिता कर्ज देण्यात येते.
घरगुती सौर प्रकल्प व इंडस्ट्रियल रूफ टॉप सौर प्रकल्प उभारणीकरिता 50 लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात येते. घरदुरूस्ती व घर नुतनीकरणासाठीही कर्ज योजना सुरू करण्यात आली असून महानगर क्षेत्रात 10 लाखापर्यंत व इतर ठिकाणी 6 लाखापर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तसेच बँक शैक्षणिक कर्ज 75 लाखापर्यंत देत आहे, या कर्ज योजना 11 टक्के या सवलतीच्या दराने सुरू केल्या आहेत, असे ओसवाल म्हणाले.