दौंड – दौंड येथील हार्डवेअर दुकानदाराला दौंड – काष्टी रस्त्यावर भीमा नदीच्या पुलावर सोनवडी हद्दीत दुचाकीवरून पाठलाग करीत आलेल्या दोन चोरट्यांनी गाडी आडवी लावून डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 50 हजार 600 रूपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड येथील कांतीलाल घनजी पारसिया (वय 46, रा. कस्तानचाळ, दौंड) यांचे दौंड – पाटस ररस्त्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. त्याचे एक दुकान श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे आहे. दौंड ते काष्टी असे दररोज ये – जा करुन ते दुकानाचे काम पाहतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते काष्टी येथील दुकानामधील जमा झालेली रोख रक्कम 2 लाख 30 हजार 600 रूपये घेऊन ते त्यांच्या मुलासोबत मोटार सायकलवरून दौंडला निघाले होते. भीमा नदीच्या पुलाजवळ सोनवडी गावच्या हद्दीत आल्यावर पाठीमागून एका मोटार सायकलवर दोन व्यक्ती आल्या. त्यांनी त्यांच्या मोटारसायकलला ओव्हरटेक करीत पाठीमागे बसलेल्या एकाने मिरची पुड तोंडावर फेकल्याने हे दोघेही खाली वाकल्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड गेली नाही.
चोरटे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गाडीचा वेग वाढवला, मात्र 30 फुट अंतरावर रस्त्याच्या बाजुला एका मोटार सायकलवर दोन व्यक्ती थांबल्या होत्या. त्यांनी त्यांच्या गाडीला मोटार सायकल आडवी मारून हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला. पैशाची बॅग व वीस हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा एकूण 2 लाख 50 हजार 600 रूपयांचा ऐवज घेऊन चार चोरटे क्षणार्धात दौंडच्या दिशेला पसार झाले. याबाबत कांतीलाल पारसिया यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक आबनावे करीत आहेत.