भोर -तालुक्यात करोनाविषयी जागृती यशस्वी होताना दिसत आहे. गुरुवारी (दि. 10) तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
भोर तालुक्यात दि. 4 ते 9 या सहा दिवसांत करोना बाधित 10 रुग्ण आढळले असून यात भोर शहरात 4, निदान सांगवी, उत्रौली, देगाव, रांजे व चिखलगावात प्रत्येकी 1 अशा 10 रुग्णांचा यात समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील करोना बाधितांची संख्या घटली असून तालुक्यात करोनाची जनजागृती यशस्वी झाली असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरुन समोर येत आहे.
भोर तालुक्यात आज अखेर करोना बाधितांची संख्या 1795 झाली असून करोनावर 1714 जणांनी मात केली असून, 69 करोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12 करोना बाधितांवर सध्या उपचार सुरु असल्याचे डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
करोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांनी खबरदारीचे उपाय अंगीकारावेत. भोर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या घटत असली तरी करोनाकडे गांभिर्याने पाहिलेच पाहिजे, असे उप वभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार आजित पाटील यांनी म्हटले आहे.