पिरंगुट: मुळशी तालुक्यात आयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापनेचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध गावांमध्ये पूर्वसंध्येला मंदिरांची साफसफाई करून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती. आकर्षक अशा रंगीबेरंगी रोषणाईने मंदिर परिसर उजाळून गेला होता. विविध ठिकाणी रांगोळ्या काढून ध्वज उभारण्यात आले होते. गावातील प्रत्येक मंदिरात काकडआरती, भजन, कीर्तन दीपोत्सव, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पिरंगुट येथे यानिमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने पारंपरिक वाद्याच्या तालात व टाळ मृदंगाच्या गजरात भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. लवळेफाटा बालाजीनगर येथील गजानन महाराज मंदिरापासून ही यात्रा सुरू झाली. मुख्य रस्ता, गणेशनगर, कुंभारवाड़ा, गोळेआळी, चावडी, पवळेआळी, सम्राट अशोकनगर मार्गे येऊन पिरंगुट कँप येथे शोभायात्रेची सांगता झाली.
यामध्ये मामासाहेब मोहोळ मेमोरिअल स्कूल, पिरंगुट इंग्लिश स्कूल, संस्कार स्कुल, श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम हायस्कूल, सरस्वती पूर्व प्राथमिक विद्या मंदीर शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून यात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रे दरम्यान 151 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.