दोघे अद्यापही फरार : पोलिसांकडून शोध सुरूच
इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यातपाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर सात तासांच्या आत इंदापूर पोलिसांनी यापैकी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांना शनिवारी (दि. 25) न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, दोघे अद्यापही फरराच आहेत.
पिन्या ऊर्फ प्रदिप कल्याण बागल, तेजस अनिल वीर, माऊली ऊर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव ता. इंदापूर) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. तर शिवाजी किसन एकाड (रा. बाव्रसमळा इंदापूर), विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी ता. इंदापूर) असे फरार असलेल्यांची नावे आहेत.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे तहसील कार्यालय येथे त्यांचे डयुटीवर शासकीय वाहन (एमएच 42 एएक्स 1661) मधून चालक मल्हारी मखरेसह जुना सोलापूर-पुणे महामार्गावरून शंभर फुटी रस्त्याकडे संविधान चौकातुन जात असताना अचानक काही जण कारने आले आणि त्यांनी तहसीलदारांच्या गाडीला आडवी कार लाऊन लाल मिरचीची पावडर तहसीलदार, चालकाच्या डोळ्यावर टाकून वाहनाच्या सर्व काचा फोडून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अपर अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरवीत सहायक निरीक्षक राजकुमार डूणगे, शिवाजी राऊत, प्रकाश पवार, विवेकानंद राळेभात, सहायक फौजदार प्रकाश माने यांच्यासह वेगवेगळी पथके नेमुन पाचपैकी तिघांना अटक केली होती.