शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरामध्ये अनेक ठिकाणी तापाच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून काही नागरिकांना डेंग्यू आजार झाल्याबाबत अहवाल प्राप्त झालेले असताना डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शिक्रापूर परिसरामध्ये सध्या स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या परिसरातील अनेक भागामध्ये वेगवेगळ्या तापांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या शिक्रापूर परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसह आदी आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत.
मात्र, अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून होणारी औषध फवारणी बंद असल्याने प्रशासनाने औषध फवारणी सुरु करण्याची मागणी देखील नागरिक करीत आहेत. मात्र, गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये वाढ होत असताना देखील गावातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व दुर्गंधी असल्याचे आढळून येत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करून गावातील सर्व परिसरांमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.
संपूर्ण गावात फवारणी करणार
शिक्रापूर गावामध्ये ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. त्या ठिकाणी तातडीने औषध फवारणी सुरु केली असून लवकरच संपूर्ण गावात फवारणी केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.