बाबाराजे जाधवराव : पुरंदरमध्ये लवरच महायुतीचा मेळावा
सासवड – ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करू. तसेच मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, भाजपचे पुरंदर-हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा जिंकण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असून यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून 50 हजाराच्या आघाडीने महायुतीचा खासदार जिंकून येईल, अशी अपेक्षा आहे त्यासाठी पक्ष बांधणीचे काम जोमाने सुरू आहे. यासाठी अनेक केंद्रीय मंत्री व पक्षाचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येत असतात असे जाधवराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.भाजपाचा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून संभाव्य चेहरा कोण असेल या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले.
पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी त्याचबरोबर ग्रामीण भागातील सर्व राम मंदिरामध्ये सोमवारी (दि. 22) मोठ्या उत्साहात अयोध्येच्या धर्तीवर राममलल्ला जन्माचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सासवड व जेजुरी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील 17 घटक पक्ष हे युतीमध्ये असून येणार्या सोमवार (दि. 22) नंतर पुरंदर तालुक्यातील सासवड येथे महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या महामेळाव्यासाठी सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
पुरंदर तालुक्यातील 45 मंदिरांची स्वच्छता करण्यात आली असून या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नेते अॅड. श्रीकांत ताम्हाणे, जवळार्जुनचे सरपंच सोमनाथ कणसे, सचिन लंबाते, सचिन पेशवे, रमाकांत काळे उपस्थित होते.