राज्यात एकूण 10 मधाची गावे करण्याचा मानस
पुणे – जिल्ह्यातील पहिले “मधाचे गाव’ म्हणून भोर तालुक्यातील गुहिणी गावाची निवड होणार आहे. महाराष्ट्र राज्य
खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून येथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला.
मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात एकूण 10 मधाची गावे करण्याचा मानस आहे. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील “मधाचे गाव’ संकल्पना राबविण्याकरीता भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्यासाठी मधकेंद्र योजनेअंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाबळेश्वर मधसंचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, तोरणा, राजगड परिसर समाजोन्नती न्यासचे व्यवस्थापक रमेश आंबेकर आणि मधपाळ उपस्थित होते.
…म्हणून गुहिणी गावाची निवड
गुहिणी गाव हे तोरणा, राजगड, मढेघाट परिसराच्या कुशीत वसलेले आहे. भाटघर धरणामागील बाजूस निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटेसे गाव आहे. मधमाशा पालनास उपयुक्त जांभुळ, आंबा, कारवी, करवर, अर्जुन, कांदळवन व आखरा आदींचे वनस्पती फुलोरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गावातील 15 मधपाळ पारंपारिक पद्धतीने आग्या, सातेरी, फुलोरी पिकळा मध गोळा करतात.