भोर-आंबाडे रस्त्यावर अपघाताचा धोका
वीसगाव खोरे – वीसगाव खोऱ्यातील भोर-आंबाडखिंड (ता. भोर) हा मांढरदेवी, वाई, पाचगणी,महाबळेश्वर या धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हजारो वाहने या मार्गावरून रोज ये-जा करीत असतात. मात्र या रस्त्यावर झाडे-झुडपे वाढ झाल्याने या झाडीझुडपात दिशादर्शक फलक झाकले गेले आहेत.
यामुळे या मार्गावरील पर्यटक आणि वाहन चालकांना धोकादायक ठिकाण, स्पीड ब्रेकर, वाहनांचा वेग, धोकादायक वळणे, झेब्रा क्रॉंसिग, एकेरी मार्ग दाखविणारे फलक दिसत नसल्यामुळे नवीन चालक व पर्यटकांना गाड्या चालवताना अडचण होत आहे.
या रस्तावर नऊ-दहा ठिकाणचे ओढ्या-नाल्यांवरील पूल (मोऱ्या) पावसामुळे नादुरुस्त होऊन ढासळले, तसेच पुलाचे कठडे तुटल्याने प्रवासी व वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलकावर वाढलेली झाडी हटवावीत आणि दुरावस्था झालेल्या पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहे.