पुणे जिल्हा : इंदापूर उपकारागृहात पुन्हा करोनाची “एन्ट्री’

16 कैद्यांना लागण : तुरुंग प्रशासन कैद्यांच्या बाबतीत निष्काळजी?

रेडा -इंदापूर शहरातील उपकारागृहातील बराकमध्ये करोनाने “एन्ट्री’ केली आहे. सलग दोन दिवसांपासून उपकारागृहातील 16 कैद्यांना करोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी म्हणजे 24 ऑगस्ट 2020 रोजी एक कैदी करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. या कैद्याच्या बाबतीत संबंधित प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांच्या बराकामधील इतर 17 कैद्यांना व दोन पोलिसांना करोनाची लागण झाली.

याबाबत मानवी हक्‍क संरक्षण अधिनियम 1993 अन्वये कैद्याला देखील मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार असून त्याला देखील वेळेवर औषध उपचार मिळवेत यासाठी राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य ऍड. तुषार देविदास झेंडे-पाटील यांनी आवाज उठवला होता. याच उपकारागृहामध्ये असणाऱ्या कैद्यांना याआधी करोनाचा संसर्ग झाला.

वास्तविक पाहता मागील वर्षी अशाच प्रकारच्या घटनेबाबात प्रशासनाच्या निष्काळजी पणाची लक्‍तरे थेट दिल्ली दरबारी पोहोचली होती. तरी देखील यावर्षी असाच प्रकार नव्याने घडल्याने प्रशासन कैद्यांच्या बाबतीत निष्काळजी आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी अटक करताना किंवा एखादा कैदी सुनावणीला घेऊन जाताना किंवा बाहेरुन आणल्यानंतर त्याची करोना चाचणी करणे कोविड 19च्या अनुषंगाने बंधनकारक असताना या उपकारागृहात करोना शिरलाच कसा? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

तुरुंग अधिकाऱ्यांनी व प्रभारी अधिकाऱ्यांनी कोणती काळजी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे राज्याचे सदस्य ऍड. तुषार झेंडे-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.