पुणे – समर्थ पोलीस ठाण्यातील एलआयबी (स्थानिक गुप्तचर विभाग)चा कर्मचारी आंदोलनस्थळी शासकीय कर्तव्य बजावत होता. यावेळी, त्याची दुचाकी समर्थ वाहतूक विभागाच्याच अधिकाऱ्याने दांडगाई दाखवत उचलली. कर्मचाऱ्याने आपण शासकीय कर्तव्य बजावत असून गाडी नो पार्किंगमध्ये नसल्याने उचलू नये, अशी विनंती केली. मात्र तरीही वाहतूक अधिकाऱ्याने दमदाटी व धक्का-बुक्की करत दुचाकी उचलून नेली. विशेष म्हणजे अद्यापही वाहनावर कोणताही दंड लावण्यात आला नाही. संबंधित कर्मचारी दंड भरण्यास तयार असूनही वाहन मागील तीन दिवस अटकावून ठेवण्यात आले आहे.
यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने एलआयबीचे कर्मचारी संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले कि, महावितरणच्या कार्यालयासमोर ३ तारखेपासून तेथील कर्मचारी कार्यालयीन वेळेत आंदोलन करत आहेत. एलआयबीचा कर्मचारी म्हणून याची गोपनीय माहिती मिळविण्याचे काम माझे आहे. यामुळे मी साध्या वेशात तेथे दुचाकीवर गेलो होतो. दुचाकी महावितरणच्या मुख्य दरवाजाजवळ लावून त्यावर बसून माहिती टिपून घेत होतो.
शेजारी वाहतूक विभागाच्या पेट्रोलिंगच्या गाड्याही पार्क होत्या. माहिती लिहून घेत असतानाच तेथे समर्थ वाहतूक विभागाचे अधिकारी राजेंद्र पुराणिक आले. त्यांनी तेथे येऊन रागाच्या भरात गाडीला जॅमर लावले. मी त्यांना एलआयबीचा कर्मचारी असून शासकीय कर्तव्य निभावत असल्याची माहिती दिली. मात्र त्यांनी काहीही न ऐकता दमदाटी व धक्का-बुक्की करत माझी गाडी उचलून नेली. गाडी पार्किंगमध्ये असतानाही मी दंड भरण्यास तयार आहे. मात्र वाहतूक विभागाने अद्यापही ई-चलन किंवा कोणत्याही प्रकारचे चलन गाडीवर केले नाही.
तसेच, मागील तीन दिवसांपासून गाडी बेकायदा अटकावून ठेवली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याशी संपर्क साधला. तर अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तक्रार अर्ज दाखल केला आहे