दादा गटाकडून शिंदे गटाला शह : सरपंचपदी सुनील पवार
वाल्हे – वागदरवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या झालेल्या दुहेरी लढतीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील संभाजी पवार हे 14 मतांनी विजयी झाले असून अजित पवार गटाने शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्यात यश मिळाले असल्याने वागदरवाडीत सत्ता परिवर्तन झाले आहे.
वाल्हे पंचक्रोशीतील एकमेव बिनविरोध ग्रामपंचायत निवड न झालेल्या वागदरवाडी ग्रामपंचायतीकडे वाल्हे व पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान, वागदरवाडी येथील निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या भैरवनाथ परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदासह 10 पैकी सात सदस्य विजयी झाले. प्रा. दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली वाल्हेसह सुकलवाडी,
आडाचीवाडी, वागदरवाडी या चारही गावांवर सत्ता स्थापन केल्याने सत्ता राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) गेली आहेत. सुनील पवार यांनी 590 मते मिळाली. तर, सत्ताधारी शिवसेनेच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे बाळासाहेब पवार यांना 576 मते मिळाली.
बाबासाहेब पवार यांचा 14 मताने पराभव झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरपंच पदाचे उमेदवार सुनील पवार व प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजी करत गुलालाची उधळण केली.
विजयी उमेदवार
वॉर्ड एक : विजया पवार, सचिन पवार, सीमा भुजबळे, वॉर्ड दोन : राजसिंह पवार, सागर पवार. निवडणुकीपूर्वी बिनविरोध उमेदवार – दीपाली पवार, संतोष पवार, सुनीता पवार, छकुली बर्गे.