पुणे – रेल्वे स्थानकात पळून आलेल्या परगावाच्या मुलींना हेरुन सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत आणण्याचे काम काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. ही संस्था आरपीएफ हवालदार अनिल पवार याने स्थापन केली आहे. पण, तिला कोणतीही परवानगी नसल्याचे समारे आले आहे.
यापूर्वी या प्रकरणात कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. तर, आरपीएफ हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासूनच तो पसार झाला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघेजण छत्तीसगडमधून पळून पुण्यात आले होते. हवालदार पवारने त्यांना हेरुन स्वत:च्या संस्थेच्या नेले. तेथे तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार करण्यात आले. तसेच छत्तीसगडवरुन तिच्या नातेवाईकामार्फत तब्बल सहा हजार रुपयेही ऑनलाइन वर्ग करुन घेतले होते. त्यानंतर घरी परत गेल्यावर मुलीने आपबिती कथन केली. त्यानंतर आरोपींवर पॉक्सो, ऍट्रोसिटी आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
मुलांना संस्थेत डांबले
रेल्वे स्थानकात आढळणाऱ्या एकट्या-दुकट्या मुलींना हेरून हवालदार पवार आणि त्याचे साथीदार सिद्धार्थ घेऊन जायचे. तेथे त्यांना धमकावून पैसे उकळले जायचे. अल्पवयीन मुले ताब्यात घेतल्यानंतर त्याची माहिती बाल न्याय मंडळाला द्यावी लागते. पळून आलेल्या मुलांना पवार हा परस्पर या संस्थेत डांबून ठेवायचा, असे तपासात उघडकीस आले आहे. पवार याने बेकायदा संस्थेत काही जणांना कामावर ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
“लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात एक महिला आणि करण राठोड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.” – श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग
मनसेकडून कार्यालयाची तोडफोड
दरम्यान, नराधम हवालदार अनिल पवार याच्या सिद्घार्थ या संस्थेच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी तोडफोड केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी केली.