लपतळवाडीत आमदार जगतापांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
परिंचे – पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी हा उपक्रम गुरूवारी (दि. 17) पासून श्रीक्षेत्र घोडेउड्डाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन करून सुरू करण्यात आला. दरम्यान, लपतळवाडी येथील दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या घोषणे नुसार बिनविरोध निवडून घेणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
यामधून रस्ते, पाणी, शाळा याची सुधारणा करण्यात येणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगून संध्याकाळी गावातील मुख्य ठिकाण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न मार्गी लागणार असून या दौऱ्यात गावपातळीवरील शासनाच्या विविध 21 शासकिय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी लपतळवाडी, तोंडल आणि वीर येथील वाड्या वस्त्यांवर जाऊन आमदार संजय जगताप यांनी शेतकरी, नागरीकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी अंमलबजावणी केली. वीर धरण परिसरात असलेल्या वनविभाग नर्सरीला भेट देऊन बारामतीच्या धरतीवर पुरंदरमध्ये मध्यवर्ती नर्सरी सुरू करणार असल्याचे सांगितले.
लपतळवाडी येथे नागरिकांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेत त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये नागरिकांचे विविध दाखल्यांचे प्रश्न, पाणी, वीज, आरोग्याच्या बाबतीतील समस्या, जमिनींच्या बाबतीतील वारस नोंद आदींबाबत नागरिकांनी प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार जगताप, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा बाजार समितीचे उपसभापती महादेव टिळेकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप उपस्थित होते.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही
प्रत्येक गावच्या वाड्यावस्त्यांवर जाऊन लोकांशी चर्चा करून तालुका पातळीवरील समस्या दर सोमवारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आदी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून सोडविण्यात येतील. त्यामुळे सामान्य नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही