शिक्रापूर/ कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एकाचा संशयातून खून करुन फरार होऊन दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बंगळुरूहून जेरबंद केले. प्रदीप बलराम गराई (रा. बंगाल, सध्या रा. उबाळेनगर वाघोली), असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोरेगाव भीमा येथे (दि.21) जानेवारी रोजी सुशांत अनिल करकरमर (रा. कोरेगाव भीमा, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा हल्लेखोराने खून केल्याचे समोर आले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, नीरज पिसाळ यांनी कसून तपास केला. प्रदीप गराई याने संशयातून करकरमर याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान, प्रदीप गराई याचा शोध घेत असताना प्रदीप हा वारंवार तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, बंगळुरू या ठिकाणी आसरा घेत होता. दरम्यान, प्रदीप हा बंगळुरूमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच बंगळुरूमध्ये सापळा लावत त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.