पुणे- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे 90 हजार 688 बालकांची निवड झाली आहे. दरम्यान “आरटीई’ पोर्टलला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पालकांना प्रवेशाबाबतचे “एसएमएस’ च गेले नाहीत. यामुळे पालकांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाला. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोर्टल मंद गतीनेच सुरू झाले.
सोमवारी (दि.4) दुपारी 4 वाजल्यानंतर पालकांना लॉटरीद्वारे प्रवेशासाठी मिळालेच्या शाळेची माहिती “एसएमएस’वर मिळणार असल्याची घोषणा प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. “एनआयसी’मार्फत काही डेटा अपडेशन करण्यासही विलंब लागला. तांत्रिक अडचणीमुळे “आरटीई’ पोर्टल सुरु होत नसल्याची बाब निदर्शनास आली. “आरटीई’ प्रवेशासाठी 90 हजार 688 बालकांना लॉटरी लागली. लॉटरी लागलेल्यांमध्ये 200 दिव्यांग बालकांचा समावेश आहे. प्रतिक्षा यादीत 69 हजार 859 बालकांचा समावेश करण्यात आला आहे.
“आरटीई’ पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे पोर्टल सुरू होण्यास वेळ लागला. रात्री पोर्टल सुरू झाल्यानंतर एकदम अनेकांनी वापर सुरू केल्यामुळे लोड आल्याने वेग कमी झाला. पालकांना मंगळवारी “एसएमएस’ मिळतील. बालकांना शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी 19 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. – राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक