पुणे – नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा ज्योतिराव फुले मुलांचे हायस्कूलच्या जागेचा करार महापालिकेने वाढवून देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक प्रशांत जगताप आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी हा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर उपमहापौर सुनीता वाडेकर आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीदेखील या संस्थेला पूर्वीच्याच भाडेदराने शाळेची जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. या दोन्ही प्रस्तावांना मान्यता दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपमहापौर वाडेकर यावेळी उपस्थित होत्या.
महापालिकेने 90 वर्षांपूर्वी नाना पेठेतील जागा डिप्रेस्ड क्लास मिशनला नाममात्र भाडेकराराने दिली होती. डिप्रेस्ड क्लास मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी महाविद्यालय, मुली व मुलांचे हायस्कूल चालविण्यात येते. या शाळा आणि महाविद्यालयामध्ये तळागाळातील तसेच बहुजन वर्गातील लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून, अनेक पिढ्या साक्षर झाल्या आहेत.
फेब्रुवारी 2021 मध्ये या संस्थेचा करार संपला होता. महापालिकेकडून संस्थेला करार वाढवून देण्याबाबत कोणतीही हालचाल केली जात नव्हती. त्यामुळे संस्था, विद्यार्थी-पालकांपुढे चिंता आहे. त्यामुळे या संस्थेस दिलेल्या जागेचा करार हा पूर्वीच्याच दराने आणि आणखी 30 वर्षांसाठी वाढवून देण्यात यावा, असे आवाहन जगताप आणि धुमाळ यांनी केले होते. या शिक्षण संस्थांना राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा ज्योतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून बहुजन समाजातील बहुसंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन ही मान्यता देण्याचे ठराव ठेवण्यात आले होते.