पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीबाबतच्या आदेशामध्ये लोकनाट्य व तमाशा यांना परवानगी देण्याबाबतचा उल्लेख केला नाही. त्यामुळे पोलीस परवानगी देत नसल्याने गावजत्रा, तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळत नाही.
त्यामुळे संबंधित आदेशात तमाशा आणि लोकनाट्याचा समावेश करावा या मागणीसाठी सर्व तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य इ. सर्व क्षेत्रातील कलाकारासहित प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून (4 जानेवारी) अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी या कलाकारांनी आपली कला सादर करून अनोखे पद्धतीने आंदोलन केले.