पुणे -कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. यावेळी शहरातील चार पोलीस ठाण्यांत उमेदवारांसह दोन माजी नगरसेवक आणि 30 ते 35 जणांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. यातील एका घटनेमुळे गंजपेठेत तणाव निर्माण झाला होते. रविवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाले होते. पैसे वाटपावरुन झालेल्या वादातून दोन गटात मध्यभागातील गंज पेठेत वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटातील 25 ते 30 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे गंजपेठेत तणाव निर्माण झाला. मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाले होते.
याबाबत नीता किशन शिंदे (42 , रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, हिरा हरिहर यांच्यासह 15 ते 16 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नीता शिंदे रात्री घरी होत्या. त्यावेळी विष्णू हरिहर आणि 15 ते 16 जण गंज पेठेत आले. शिंदे यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की व मारहाण केली तसेच शिंदे आणि त्यांच्या मावशीलाही धक्काबुक्की केली.
दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते हिरालाल नारायण हरिहर (67 , रा. गंज पेठ) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
रासने, धंगेकर, बिडकरांवरही गुन्हा
विश्रामबाग पोलीस ठाण्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मतदान करताना त्यांनी पक्षाच्या चिन्हाचे उपरणे खांद्यावर घेतले होते. तर समर्थ पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष फैय्याज शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार बिडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये शेख कार्यकर्त्यांसह फिरत असताना त्यांना आयशा कॉम्पलेक्स येथे भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत आहेत अशी माहिती मिळाली. त्यांनी तेथे धाव घेतली असता, तेथे गणेश बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते उभे दिसले. त्यांच्या हातात एक पिशवी आणि मतदानाच्या स्लिप होत्या. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध मतदानाच्या 48 तासापूर्वी प्रचारसभा घेण्यास मनाई असतानाही प्रचार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.