पुणे -मतदारांना पैसे वाटण्यास विरोध केला, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याबाबत पोलिसांकडे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप केल्याचा तसेच विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन थेट बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महात्मा फुले पेठ (गंज पेठ) येथील लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी यावेळी उपस्थित होते.
गंजपेठ येथे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांचे कुटुंबीय मतदारांना पैसे वाटत होते. त्याला विशाल कांबळे आणि अन्य कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यावेळी बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री विष्णू हरिहर तसेच निर्मल हरिहर आणि हिरा हरिहर यांच्यासह अन्य काही जणांनी गंजपेठेत विशाल कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांसह अन्य सदस्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार मीठगंज पोलीस चौकीत दाखल केल्याची माहिती बागवे आणि जगताप यांनी दिली. दरम्यान, निर्मल आणि हिरा हरिहर यांनीही विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक आणि अन्य यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अजामिनपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी हरिहर यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. रविवारी ते विविध मतदानकेंद्रांवर निर्धास्तपणे फिरत होते. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप जगताप यांनी केला.