पुणे – सहकारनगर परिसरात मध्यरात्री चहाच्या स्टॉलवर दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने राडा घालत भावाला मारून टाकल्याच्या संशयातून तरूणावर कोयत्याने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत चंद्रकांत कांबळे (वय 26, रा. मांगडेवाडी पेट्रोल पंप) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कांबळे याने दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे व त्याचा मित्र आईला भेटून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. सहकारनगर परिसरात आल्यानंतर गोल्डीज इराणी चहाच्या हॉटेलवर चुलत भाऊ आल्याने चहा पिण्यास थांबले. दरम्यान, दोन दुचाकीवर ट्रिपल शीट आलेल्या कोयते धारी टोळक्यातील एकाने यानेच माझ्या भावाला मारून टाकले आहे. आज याला सोडायचे नाही. असे म्हणत डोक्यात तसेच पाठीवर कोयत्याने वार केले. यावेळी मोठी गर्दी जमली. त्यावेळी या टोळक्याने दहशत माजवित मोठमोठ्याने आरडा ओरडाकरून जमलेल्या नागरिकांना देखील धमकावले. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.