पुणे – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) हडपसरमधील शिंदे वस्तीत बांधण्यात आलेल्या इमारतीत शिरून चोरट्यांनी ४३९ सदनिकांमधील नळ चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील तहसीलदार विकास भालेराव (४७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भालेराव प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी विभागातील ताबा विभागाचे प्रमुख आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हडपसरमधील शिंदे वस्तीत इमारती बांधण्यात आल्या आहेत. ‘ए’ आणि ‘बी’ या इमारतीतील एकुण मिळून ४३९ सदनिका आहेत. या इमारतीतील सदनिका बंद आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकांच्या दरवाज्याचे कुलुप तोडून स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील नळ, शॉवर चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नऊ हजार ७५० रुपये असल्याचे भालेराव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत. शिंदे वस्तीतील एसआरए योजनेतील सदनिकांचा काहीजणांनी ताबा घेतला आहे. काही सदनिकांचा ताबा अद्यााप घेण्यात आला नाही. इमारतीच्या आवारात सुरक्षारक्षक आहेत.