पुणे – पोलिसांच्या सापळ्यात सापडू नये म्हणून टुरिस्ट कारचा वापर वेश्या व्यवसायासाठी करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यांच्या ताब्यातून परराज्यांतील दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने केली.
कुलदीपप्रसाद महतो (26, रा. जी.बी. डोंगरीपाडा, ठाणे) आणि जयशंकरप्रसाद साव (20, रा. जेकब सर्कल, मुंबई. दोघेही मूळ : झारखंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. विमाननगर, येरवडा परिसरात दोन संशयित व्यक्ती टुरिस्ट कारमध्ये फिरत असून, त्यातील महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून साकोरेनगर, विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या. त्यावेळी आरोपी दोन पीडित महिलांना घेऊन आले. यानंतर पोलिसांनी दोन्ही दलालांना ताब्यात घेत, त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद माने, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, अण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.