बेगूसराय – बिहारमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला समजावण्यासाठी तिचे वडील, आई आणि भाउ गेले होते. त्यातून त्यांची समस्या तर सुटलीच नाही. मात्र कायद्याचा कोणताही धाक न राहीलेल्या संबंधित आरोपीने या सगळ्यांवर ऍसिड फेकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत आरोपी स्वत:ही जखमी झाला आहे. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी शिवणकाम शिकायला जाते. ते खूप गरीब असल्यामुळे हातावरचे पोट आहे. मुलगी ज्या भागात जाते तेथे सोन्या चांदीची दुकाने आहेत. येथील एक जण तिची छेड काढत असल्यामुळे ती घाबरली होती. तिने याबाबत घरच्यांना सांगितल्यावर त्याची समजूत काढण्यासाठी ते सगळे गेले होते. तेव्हा आपल्या दुकानात दागिने स्वच्छ करण्यासाठी जे ऍसिड ठेवले असते ते त्याने मुलीच्या पालकांच्या आणि भावाच्या अंगावर फेकले. या घटनेत हे सर्व जण जखमी झाले आहेत.