पुणे – जांभुळकर चौक ट्युन टॉवर सोसायटीतील एका बंद सदिनिकेवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारला. यावेळी सोन्याचे दागिणे, रोकड, घड्याळ असा 1 लाख 22 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वा एक ते साडेचारच्या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी सागर सुनिल खांदवे (वय.27,रा.ट्यून टॉवर सोसायटी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घऱफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खांदवे हे बुधवारी दुपारी घराला कुलूप लावून क्लाससाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, रोकड व घड्याळ असा 1 लाख 22 हजारांचा ऐवज चोरी करून पळ काढला.
दरम्यान खांदवे क्लासवरून घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.