पुणे – मित्राने चिडवल्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना कदमवाकवस्ती येथील रेल्वे लाईन शेजारी घडली. याप्रकरणी आरोपी स्वत:हून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
आकाश दगडू आढाळे (रा.कदमवाकवस्ती) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर नितीन बापु गायकवाड(34) असे गंभीर जखमी व्यक्तीने नाव आहे. आरोपी आकाशवर अगोदर एक बॉडी ऑफेन्सचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी आकाश व जखमी नितीन लहानपणापासून एकमेकांच्या शेजारी रहात आहेत. यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. नितीन हा प्लंबिंगची कामे करतो. नितीने चेष्टा मस्करीत आकाशला चिडवले होते. याचा राग आल्याने आकाशने कुऱ्हाडीने नितीनच्या मानेवर, डोक्यात आणी पोटात वार केले.
यामध्ये नितीन गंभीर जखमी झाला. त्याच्या मदतीला शेजारचे धावून आले असता आकाशने कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्यांना दमदाटी केली. याप्रकरणी नितीनच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आकाश स्वत:हून पोलिसांत हजर झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करत आहेत.