पुणे – महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रूबी हॉलदरम्यान येत्या दोन दिवसांमध्ये मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीनंतर “सीएमआरएस’ंची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
वनाज ते रामवाडी मार्गिकेवरील गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकदरम्यान नोव्हेंबर 2022 मध्ये मेट्रोची चाचणी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर डिसेंबर 2022 मध्ये चाचणी घेण्यात आली होती. या दोन्ही मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता येत्या एक-दोन दिवसांत पुढील टप्प्यातील सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रूबी हॉलस्थानक या मार्गिकेवर चाचणी घेण्यात येणार आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रूबी हॉल स्थानक या मार्गिकेवर मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट दोन्ही सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.
मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. मंगळवार पेठ स्थानक हे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित