सातारा – येथील नक्षत्र संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद मैदानावर उद्या, दि. 26 पासून सुरू होणार्या ‘नक्षत्र महोत्सव 2024’चे उद्घाटन राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार उदयनराजे भोसले भूषविणार आहेत.
हे प्रदर्शन दि. 30 पर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्ष सौ. दमयंतीराजे भोसले आणि उपाध्यक्ष सौ. स्मिता घोडके यांनी केले आहे.
पंकजा मुंडे-पालवे ह्या त्यांच्या नियोजित नाशिक दौर्यातून वेळ काढून उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध वेगळे आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, तेव्हा खासदार उदयनराजे भोसले हे सख्ख्या भावाप्रमाणे आम्हा भगिनींच्या पाठीशी उभे राहिले होते.
ही बाब आम्ही कधीही विसरू शकत नाही. नक्षत्रच्या माध्यमातून सातारकरांना भेटण्याची संधी मिळत आहे. ती दवडणे शक्य नाही, अशा भावना पंकजा मुंडे यांनी दूरध्वनीवरुन व्यक्त केल्या, असे सौ. स्मिता घोडके यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.