पुणे – २६\११ सारखा मोठा हल्ला करण्याच्या तयारीतील आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांना बेड्या ठोकणाऱ्या कोथरूड मधील ५ पोलीस अमलदारांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांना १० लाख रोख रक्कम आणि प्रमाणपत्र एनआयएचे पोलीस अधिकारी इंगवले आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणा मागच्या काही वर्षांपासून अल सुफा या संघटनेशी निगडित असणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना या तिघा दहशतवाद्यांना पकडले होते, त्यांची घरझडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम पसार झाला होता.
युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांना एनआयएने फरार घोषित केल्याचे समजले. त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर एनआयएने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे दहशतवादी कारवायांचा डाव उधळला गेल्याने या उत्कृष्ठ कामगिरी केल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यातील अंमलदार अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांना तसेच यावेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक नीलिमा पवार यांचा सन्मान करण्यात आला.