पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर टीका करणाऱ्या फलकाची जोरदार चर्चा रंगली आहे. शहराच्या मुख्य भागांत लोकसेवा आयोग, अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या काही खासगी क्लासेसवर टीका करणारे असंख्य फलक दिसून येत आहे. हे फलक उमेदवारांमध्ये व्हायरल होत आहेत.
एमपीएससीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे फलक युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांनी ठिकठिकाणी लावले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोगाकडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. समितीचे काही जण हे विविध खासगी क्लासेसच्या पॅनेलवर आहेत. त्यावरून ते क्लासेसवाल्यांचे पाठबळ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रभावित करत असल्याचा थेट आरोप यादव यांनी केला आहे.
एमपीएससीचा अभ्यासक्रम बदलताना पूर्वसूचना देऊन अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. कोणताही अभ्यासक्रम बदल करताना उमेदवरांना तीन ते चार वर्षे आधी दिल्याचा अनुभव आहे. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यामागचे नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्नही यादव यांनी उपस्थित केला आहे.
‘आता फक्त फलक लावलेत; उद्या कोर्टात जाऊ’
“शहरात आम्ही आता फक्त फलक लावून विद्यार्थ्यांना सत्य माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाने त्रिसदस्यीय समितीला ठेवलेले अधिकारी आणि क्लास चालकांशी असणारे साटेलोटे थांबले नाही, तर मात्र कोर्टात जाऊन जनहित याचिका दाखल करू,’ असा इशारा कल्पेश यादव यांनी दिला आहे.