पुणे – नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने पीएमपीने स्वारगेट ते सहकारनगर या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. अटल बस सेवेअंतर्गत सुरू झालेल्या या मार्गावर नागरिकांना पाच रुपयांत प्रवास करता येणार आहे.
स्वारगेट ते सहकारनगर या मार्गावर मंगळवारपासून बससेवा सुरू केली. महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक महेश वाबळे, स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मनिषा वाबळे, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, चंद्रकांत वरपे, सतीश गाटे, राजेश कुदळे यांच्या उपस्थितीत बससेवेचे उद्घाटन झाले. स्वारगेट, लक्ष्मीनारायण टॉकीज, पंचमी हॉटेल, लक्ष्मीनगर, सारंग सोसायटी, सहकारनगर असा या बसचा मार्ग असून, दर 40 मिनिटांनी सेवा उपलब्ध होणार आहे.
पुणे महानगपालिकेतर्फे पीएमपीच्या ताफ्यात 50 मिडी सीएनजी एसी बस दिल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून “पुण्यदशम’ बससेवेअंतर्गत सध्या शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये 10 रुपयांत दिवसभर प्रवास ही सेवा पुरविली जात आहे. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात आणखी मिडी सीएनजी एसी बस दाखल होणार असून, शहरात “पुण्यदशम’ बससेवा पुरवली जाणार असल्याचे मोहोळ म्हणाले.