मार्केट यार्ड – युरोप आणि मध्य पूर्व देशांकडून मागणी वाढल्यामुळे बासमती तांदळाचे भाव वधारले आहेत. मोठ्या प्रमाणावर बासमतीची निर्यात होत असल्याने, देशातील बाजारपेठेतही बासमतीचे दर १० ते १५ टक्के वाढले आहेत. बासमती तांदूळ निर्यातीचे किमान दर मागच्या महिन्यात 1,200 डॉलर प्रति टनावरून 950 डॉलर प्रति टन करण्याच्या निर्णय झाल्यानंतर, निर्यात करारांमध्ये अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे दर वधारत आहेत, असे दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.
भारतीय निर्यातदारांनी पाच लाख मे. टन बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. घाऊक बाजारात, उत्तम प्रतीच्या बासमतीचा धान ( भात) दर यावेळी प्रति टन रू. ५० हजारपर्यंत गेला आहे, मागच्या वर्षी तो रू. ४० ते ४५ हजार होता, तर इतर प्रतीच्या बासमती धान( भात) दर गेल्या वर्षीच्या ४० हजार रुपयांवरून ४६ हजार रुपयांवर वधारले आहेत.
लांब दाण्यांचे सुगंधी प्रिमियम वाण असलेल्या बासमती राइसची, दरवर्षी 4 दशलक्ष टनांहून अधिक निर्यात भारताकडून इराण, इराक, येमेन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांना करतो. युरोप ही तांदळाची दुसरी मोठी बाजारपेठ आहे, असे बाठिया यांनी सांगितले.
देशांतर्गत किमती…
भारत सरकारने देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी जुलैमध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि नंतर बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी किंमत निश्चित केली होती. राइस मिलर्स आणि निर्यातदारांनी उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडे बासमती खरेदीसाठी मोठी मागणी नोंदवली आहे, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नवी दिल्लीस्थित एका सल्लागार संस्थेच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, शहरी भागातील कुटुंबांचा बासमती तांदळावरील खर्च यंदा 20% ते 40% टक्क्यांनी वाढला आहे.