कर्जत – प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाहीत. आम्ही लोकांची कामे करण्यासाठी बांधील आहोत. लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून त्यांना कसे पुढे नेता येईल यासाठी आम्हीं बांधील आहोत, हा शब्द आपल्या सर्वांना देतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जतमध्ये आजोजित केलेल्या निर्धार सभेत नागरिकांना दिला.
याप्रसंगी मंत्री अदिती तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, उमा मुंढे, आमदार अनिकेत तटकरे, अंकित साखरे, दत्तात्रय मसुरकर, एकनाथ धुळे, अशोक भोपतराव, भरत भगत, भगवान चंचे, रंजना धुळे, भगवान भोईर, मधुकर घारे, स्वप्निल पालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानात निर्धार सभेचे आयोजन केले होते. यावेळी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घारे यांनी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढली.
महापुरुषाणच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरवात करण्यात आली. या निर्धार सभेवेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, जे चाळीस वर्षात कोणाला जमले नाही ते सुधाकर घारे यांनी करून दाखविले आहे. या सभेमुळे जिल्ह्यातील पक्षाची ताकद वाढणार आहे.