पुणे – केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने पुण्यात १६ ते २४ डिसेंबर या कालावधी पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेस या कार्यक्रमाचे सहप्रायोजक करण्यात आले होते. त्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार, एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर १४ डिसेंबर रोजी स्टोरी टेलिंग गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड करण्यात आले.
मात्र, हे रेकाॅर्ड महापालिकेस चांगलेच महागात पडले असून, या कार्यक्रमासाठी ३० लाख ३७ हजार रुपयांचा खर्च महापालिका देणार आहे. त्यातच हा कार्यक्रम महापालिकेस अचानक कळविण्यात आल्याने पालिकेकडे यासाठी निधीची तरतूदही नव्हती. त्यामुळे वर्गीकरणातून हा निधी दिला जाणार असून, त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या गिनिज वर्ल्डच्या कार्यक्रमासाठी ५ हजार पालक, पाच हजार मुलांसाठी बसण्याची व्यवस्था, मांडव, कापडी मास्किंग, स्वागत कमानी, खाद्य पदार्थांचे स्टाॅल, तसेच इतर खर्च करण्यात आला होता.
तर या कार्यक्रमाच्या संयोजनात मोठया प्रमणात भाजपचे शहर पदाधिकारी समाविष्ट झाल्याने भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टिका विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र, आता या कार्यक्रमासाठी महापालिकेचा निधी खर्ची पडला असल्याने या रेकाॅर्डचा खर्च पुणेकरांच्या खिशातून जाणार आहे.
स्थायी समितीत वर्गीकरणाचा प्रस्ताव
महापालिकेकडून या कार्यक्रमासह सारसबागेत बालोत्सव साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही महापालिकेकडून सुमारे २७ लाखांचा खर्च करण्यात आला असून, हे दोन्ही खर्च देण्यासाठी निधी नसल्याने वर्गीकरणाद्वारे निधी देण्याच प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा निधी वडगावशेरी येथे स्वच्छतागृह बांधणे, हिंगणे येथील विरंगुळा केंद्र, तसेच कोंढवा येथील सिव्हिक कल्चर सेंटरच्या कामाच्या उर्वरित खर्चातून दिला जाणार आहे.