मंचर येथे धक्कादायक प्रकार उघड : प्रशिक्षणातील शिक्षक गॅसवर
मंचर (प्रतिनिधी) – येथील सर्वेक्षणासाठी करोना संसर्ग झालेल्या शिक्षकाचीच नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात करोनाचा संसर्ग वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविली होती. दरम्यान, सर्वेक्षणासाठी करोना झालेल्या शिक्षकाचीच नेमणूक झाल्याचे आढळल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी केली आहे.
हे सर्वेक्षण करण्यासाठी प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मंचर येथे आयोजित केले होते. प्रशिक्षणाचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांनी 8 सप्टेंबरला व्हॉट्सऍपवर शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवले. हा आदेश शिक्षकांना उशिरा मिळाला तरीही शिक्षक वेळेवर प्रशिक्षणासाठी मंचर येथे उपस्थित होते. प्रत्यक्ष प्रशिक्षण 4ः39 ला सुरू झाले.
प्रशिक्षण उशिरा संपल्यामुळे महिला शिक्षकांना वाहनाची सुविधा नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. यादरम्यान प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकास करोना झाला होता की नाही, या उलगडा अद्याप झाला नाही; परंतु हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाचा दळभद्री कारभार चव्हाट्यावर आला आहे. सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षकांची अँटिजेन टेस्ट करून सर्व्हेक्षणाचे आदेश देण्याची मागणी तोडकर व भेके यांनी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऑनलाइन प्रशिक्षण का नाही दिले?
हे प्रशिक्षण ऑनलाइन घेणे शक्य असताना प्रशासनाने सुमारे 300 शिक्षकांना एकत्रित केले होते. प्रशिक्षणस्थळी सुरक्षिततेच्या संदर्भात उपाययोजना केल्या नव्हत्या. शिक्षकांच्या उपस्थितीसाठी हजेरीपत्रक ठेवले होते, त्यामुळे उपस्थित शिक्षकांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे शिक्षक प्रशिक्षणातून आल्याने इतर शिक्षकांची झोपच उडाली आहे.