कात्रज (पुणे) – कात्रज-कोंढवा रोडवरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकने 8 ते 10 वाहनांना धडक दिली होती. गुरूवारी (दि. 10) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रक स्मशानभूमी जवळ हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले होते.
त्यानंतर पुन्हा कात्रज-कोंढवा रोड वरील माऊली नगर चौकात रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने पादचारी महिलेला उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात प्रभावती पांडुरंग अनभुले (वय 70 रा.विग्नहर्तानगर) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे.
सदर महिला खाजगी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम संपून घरी माऊली नगरकडे जात असताना मुख्य रस्त्यावर ट्रकची धडक बसली आणि या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती अपघात प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. या अपघातातील ट्रक चालकास ताब्यात घेतला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका आठवड्यात हा तिसरा भीषण अपघात झाला असून ही तिसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे.