रथावर 32 लाख दोन हजार सहाशे पंधरा रुपये अर्पण
वडूज – सिध्दनाथाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात निमसोड, ता. खटाव येथील ग्रामदैवत श्रीसिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. हजारो भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत सिद्धनाथ नावाने चांगभलंच्या जयघोषाने निमसोड नगरी दुमदुमून गेली. भाविकांनी यावर्षी रथावर पैशाचा अक्षरशः पाऊस पाडला.
चालू वर्षी रथावर 32 लाख दोन हजार सहाशे पंधरा रुपये इतकी प्रचंड रक्कम देणगी रुपाने जमा झाली. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी 3 लाख रुपयांची वाढ झाली. सिद्धनाथाचा वार्षिक यात्रेचा रथोत्सव हा मुख्य दिवस असतो. सकाळी 11 वाजता सिद्धनाथाचा नवीन रथाचा शुभारंभ गावातील मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून देवालयाच्या आवारात करण्यात आला.
सर्व ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असणाऱ्या देवाच्या रथोत्सवासाठी परिसरातील हजारो भाविक, चाकरमानी उपस्थित होते. गुलाल, खोबऱ्याची पुष्पवृष्ठी करीत सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या मार्गात सडा-रांगोळींसह ठिकठिकाणी फटाक्याचे आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले.
भाविकांनी दहा रुपयापासून एक लाखापर्यतच्या नोटांच्या माळा, चांदीच्या वस्तू भक्तिभावाने अर्पण केल्या. गावातील माहेऱवासिनींसह महिला वर्ग व ग्रामस्थ, नोकरदार, व्यावसायिक रथावर देणगी अर्पण करीत होते. रथ मिरवणुकीपुढे मानाचे अश्व, झांजपथक, लेझीम पथक, बॅन्ड पथक, गजीनृत्य आदी वाद्यवृदांच्या गजरात मिरवणुकीत रथ चावडी चौक, मेनपेठ, हनुमान चौक, शनिवार पेठ, भैरव टाका, देशमुख आळी, हरिजन वस्ती, चावडी चौक, घाडगे आळी, बाजार पेठ मार्गे आठ तास सुरु होती. रात्री नऊ वाजता रथयात्रा मंदिराजवळ आल्यावर रथावरील रक्कम एकत्र करून रात्री उशिरांपर्यत सर्व ग्रामस्थाच्या साक्षीने रथावरील रकमेचे मोजदाद करण्यात आली.
या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती. यात्रेत मेवा मिठाई, खेळणी, पाळणे, फिरते व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आले होते.
यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळांनी परिश्रम घेतले. निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्राने साथीचे आजार होऊ नयेत म्हणून वैद्यकीय अधिकारी कु. प्रियांका पाटील यांनी आरोग्य व्यवस्था दक्ष ठेवली होती. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी वडूजचे पीएसआय अशोक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मायणीचे पो.नि. शहाजी गोसावी व त्यांचे सहकाऱ्यानी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.