पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत अधिराज दुधाने, अथर्व येलभर, रेवा भातखळकर, आयुश्री तरंगे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अथर्व येलभरने अव्वल मानांकित नीरज जोर्वेकरचा 4-1, 4-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. अथर्व हा म्हातोबा तुकाराम बालवाडकर महाविद्यालयमध्ये नववी इयत्तेत शिकत असून पाषाण टेनिस अकादमीत प्रशिक्षक सुनील कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित आयुश्री तरंगेने चौथ्या मानांकित अयाती तुडयेकरचा 2-4, 4-2, 4-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.
12 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत बिगरमानांकीत रेवा भातखळकरने अव्वल मानांकित वाण्या अगरवालचा 5-3, 4-1 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. तर, मुलांच्या गटात अव्वल मानांकित अधिराज दुधाने याने वीर जोशीलकरचा असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमेड्यूज एंटरप्रायझेसच्या वितरण विभागाचे वरिष्ठ संचालक हिमांशू कपाटीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत, स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे आदी उपस्थित होते.