खडकवासला – किरकटवाडी, नांदेड फाट्या जवळील गोसावी वस्ती समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह कालव्याजवळील झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल चंद्रकांत आटोळे (३६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
आज (१२ जून) सकाळी सिल्वर बर्च हॉस्पिटलच्या समोर कालव्यालगत असलेल्या झाडाझुडपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. याबाबत हवेली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हत्या झालेल्या राहुल आटोळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आहेत. राहुल पेरू विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. त्याची हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.