पुणे – टोयाटो कंपनीच्या आंबेगाव येथील शोरुममधून साडेआठ लाखाची रोकड चोरण्यात आली. विशेष म्हणजे शोरुमच्या मुख्य दरवाजावर दोन सुरक्षा रक्षक असताना ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोयाटो शोरुमचे एच आर योगेश रमेश पवार (40, रा.गोकुळनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. ते काम करत असलेले शोरुम जानेवारी 2023 पासून सुरु झाले आहे. शोरुम सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत खुले असते. दररोजच्या व्यवहाराची रोकड तीजोरीत ठेवली जाते.गुरुवारी सायंकाळी सर्व व्यवहार पुर्ण झाल्यानंतर रोखपाल मयुर जेधे यांनी रोकड तीजोरीत ठेवली होती. त्यानंतर शेवटचा कर्मचारी रात्री साडेआठ वाजता शोरुमला लॉक लावून निघुन गेला होता. त्यावेळी शोरुमच्या बाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात होते.
दुसऱ्या दिवशी शोरुम उघडल्यावर कर्मचारी मोईन सय्यद याला तीजोरी उघडली दिसली तसेच इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यानंतर शोरुममधले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन व्यक्ती काचेची खिडकी उघडून आतमध्ये जाताना दिसले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.