पुणे – उन्हाळ्यानिमित्त एसटीच्या 150 जादा बसेस

जिल्ह्यातील 13 स्थानकांतून सुटणार गाड्या

पुणे – उन्हाळी सुट्टया सुरू झाल्या आणि बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या तसेच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांना बससेवा तत्काळ उपलब्ध व्हावी आणि प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून 150 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यात शिक्षण किंवा नोकरीसाठी विविध जिल्हे आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक आणि तरूण येत असतात. मात्र, सुट्टया लागल्यानंतर परत गावाला जाण्यासाठी या प्रवाशांची स्थानकावर मोठी गर्दी होते. यावेळी एसटीला गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशी खासगी वाहनांनी प्रवास करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन केले जाते. राज्यातील बहुतांश मार्गावर प्रवाशांची गर्दी अधिक असते, त्यामुळे एनवेळी प्रवाशाचा फज्जा उडू नये, यासाठी एक ते दोन महिने आधीच रिझर्व्हेशन करून ठेवले जाते. त्यामुळे ऐनवेळी निघालेल्या प्रवाशांना गाडीची वाट पाहत उभे रहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागाने स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकासह पिंपरी-चिंचवड, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर यासह 13 स्थानकांतून या जादा बस सोडण्यात येणार आहे.

कोणत्या स्थानकावरून कोठे जादा बसेस
शिवाजीनगर स्थानक – जालना, बीड, धुळे, लातूर, मालेगाव, अकोला.
स्वारगेट – तुळजापूर, बिदर, विजापूर, गुलबर्गा, गाणगापूर, पंढरपूर, दापोली
पिंपरी -चिंचवड – लातूर, बीड, कोल्हापूर.
नारायणगाव – संगमनेर, नाशिक, शिर्डी, बार्शी, औरंगाबाद, त्र्यंबकेश्‍वर,
राजगुरूनगर – पैठण, धुळे, बार्शी, बीड
तळेगाव – शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, तुळजापूर
शिरूर – औरंगाबाद, तुळजापूर, जालना, बीड
बारामती – औरंगाबाद, बीड, शिर्डी, सोलापूर, पंढरपूर, सातारा, दादर
एमआयडीसी – लातूर, बीड
इंदापूर – धारूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, तुळजापूर, इचलकरंजी, परळी.
दौंड – जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.