नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यात समाजवादी पक्ष आघाडीवर असून भाजपमधील अनेक नेत्यांची सपामध्ये सामील होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र हे सर्व सुरू असताना अखिलेश यादव यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची मान्यता रद्द करावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका भाजपचे नेते आणि सर्वोच्च न्यायलायतील वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली आहे.
समाजवादी पक्षाने कैराना येथे नाहिद हसन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला तिकीट देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी नाहिद हसन यांच्यासोबत त्याची आई तबस्सुम आणि इतर ३८ गुन्हेगारांवर कारवाई केली होती. यानंतर ते सर्व फरार झाले होते. तबस्सुम याच मतदार संघाच्या खासदार होत्या.
मागील वर्षी जानेवारीमध्ये हसन याने शरणागती पत्करली होती. मात्र त्यानंतर तो पुन्हा फरार झाला होता. आता हसन शनिवारी कैराना न्यायालयात शरण आला.
दरम्यान हसन याला तिकीट देण्यावरून योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाने कैराना, मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि लोनी येथे गुन्हेगारांना निवडणुकांचे तिकीट दिले आहे. यावरून सपाची इच्छा काय आहेत हे कळून येते. गुन्हेगारांना तिकीट देऊन सत्ता स्थापन करणे आणि सत्ताला शोषणाचे प्रतीक बनवणे हीच अखिलेश यादव यांची योजना असल्याचा आरोपही योगींनी केला.