नवी दिल्ली – देशात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख एन.के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे.
3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. जानेवारी अखेरपर्यंत सर्व 7.4 कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून 12 ते 15 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, 3 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा 50लाखाहून अधिक मुलांनी पहिला डोस मिळवण्यासाठी नोंदणी केली होती. पहिल्याच दिवशी 40लाखाहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 16 दिवसांत 3.38 कोटी मुलांना लस देण्यात आली आहे.