खटाव – करोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून परिसरात जनजागृती व मदतीसाठी मोहिम राबविण्यात आली.
दरूज ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांनी दक्षता म्हणून काही दिवस गावांमध्ये प्रवेश करु नये, गावातील लोकांनी विनाकारण गावात भटकंती करु नये, यासाठी महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी व शहाजीराजे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या नेतृत्वाखाली येथील दरजाई फाटा, खटाव रोड, भुरकवडी रोड, दिवडी-महिमानगड रोड, पेडगाव रोड या ठिकाणाहून येणाऱ्या रस्त्यावर योग्य खबरदारी घेऊन एक विशिष्ट कमिटी स्थापन करण्यात आली.
या कमिटीने ग्राम दक्षता समितीच्या मदतीने गावांमध्ये व गरजूंना सॅनिटायझर, मास्क,हॅन्डग्लोज चे वाटप करण्यात आले. गावाला जोडणा-या रस्त्यावर चेकपोस्ट व उभारून बाहेरून येणाऱ्या लोकांची यादी केली. तसेच काही संशयास्पद लोकांना प्रबोधन करून क्वारंटाइन राहण्यास सांगितले. करोनासंदर्भात पूर्ण माहिती देऊन जनजागृती केली.