पुणे -जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सक्शन मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.2020-21 या जिल्हा वार्षिक योजनेतील नावीन्यपूर्ण उपक्रमातून घेण्यात आलेल्या मशिनचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी सक्शन मशीन नाही. स्वच्छतागृहांच्या सेफ्टी टॅंक क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी मशीन भाडेतत्वावर घ्यावी लागते. यासंदर्भात दैनिक प्रभातने बातमी प्रसिध्द केली. त्याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रयत्न करुन जिल्हा नियोजन समितीच्या 2020-21 च्या निधीतून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी मशीन दिले जाणार आहेत.
जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 18 ग्रामपंचायतींना सक्शन मशीनचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी एका मशीनची किंमत 8 लाख 90 हजार रुपये असून, 1 कोटी 78 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी, ओतूर, खेडमधील चिंबळी आणि चऱ्होली खुर्द, आंबेगाव- अवसरी (बु), बारामती – निबूंत, इंदापूर- भिगवण व अंथुर्णे, पुरंदर – निरा, शिरूर -राजंणगाव, मुळशी हिंजवडी व भूगाव, मावळ-कार्ला, कामशेत व इंदोरी, हवेली-उरूळी, कांचन, लोणी काळभोर ग्रामपंचायतींचा समावेश आहे.