भोर-पंढरपूर बसमध्ये 19 मे रोजी घडलेला प्रकार
आगार व्यवस्थापकाच्या दिलगिरीनंतर आंदोलन घेतले मागे
भोर – ज्येष्ठ नागरिक वारकरी हे पूर्वानियोजित एसटी बस करून दर अमावस्येला क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जात असतात. वारकऱ्यांना नेण्या-आणण्याची जबाबदारी भोर आगाराने घेतलेली असताना त्यांना पंढरपूर येथे सोडून चालकाने बस पुन्हा भोर आगारात आणल्याने पंढरपूरहून भोरला येण्यासाठी ज्येष्ठ वारकऱ्यांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागला. आगार व्यवस्थापकाने ज्येष्ठांची हेंडसांड केली असल्याने भोर बस स्थानकात आंदोलन करून महामंडाळाच्या मनमानी कारभाराचा वारकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. आगार व्यवस्थापकाने वारकऱ्यांची झालेली कुचंबणा विचारात घेवून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
भोर तालुक्यातील जेष्ठ नागरिक वारकरी दर अमावस्याला स्पेशल एसटी बस करून पंढरपूरला जातात. या बसमध्ये सुमारे 70 ते 75 ज्येष्ठ वारकरी दाटीवाटीने बसून प्रवास करतात. हे सर्व वारकरी एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे विठुरायाचे दर्शन घेऊन सकाळी लवकर परतीच्या प्रवासाला निघत असतो.
शुकवारी (दि. 19) सकाळी 9 वाजता स्पेशल एसटीने वारकरी भोरवरून निघाले आणि दुपारी 3 वाजता पंढरपूर येथे पोहोचले. हे वारकरी बसमधून उतरत असतानाच भोर आगार व्यवस्थापकांनी एसटी चालक जाधव यांना मोबाइलवर फोन करून वारकऱ्यांना सोडून लगेच माघारी येण्यास सांगितले. यावेळी बसचालक जाधव यांच्याकडून फोन घेऊन शंकर गुरव यांनी भोर आगार व्यवस्थापकांना दर अमावस्येला स्पेशल बसने पंढरपूरला येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी भोरला निघत असून, बस परत गेल्यास शनिवारी (दि. 20) परत येताना गैरसोय होईल, असे सांगितले; पण आगार व्यवस्थापकाने- ते मला माहीत नाही. तुम्ही कशाने पण या, बस माघारी पाठवा, असे सांगितले आणि त्यांनी अधिकाराचा वापर करत बस माघारी आणण्यास भाग पाडले.
तीन गाड्या बदलून वारकरी परतले भोरमध्ये
पंढरपूर येथे अमावस्येला प्रत्येकवेळी एसटीचा मुक्कमा असतो, असे असताना भोर आगार व्यवस्थापकांनी स्पेशल बस देऊन व लगेच माघारी बोलवून ज्येष्ठ वारकऱ्यांची गैरसोय केली. वारकरऱ्यांना तीन गाड्या बदलुन भोरला यावे लागले. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. काही जण या दगदगीने आजारीही पडले. अशा प्रकारे भोर व्यवस्थापनाने ज्यीष्ठ नागरीकांची चेष्टा केली असल्यामुळे मंगळवार (दि. 23) भोर बस स्थानकात ज्येष्ठ वारकऱ्यांनी आंदोलन केले.
आमदार थोपटे यांची मध्यस्थी
भोर आगार व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान केला असल्याची तक्रार या वारकऱ्यांनी थेट आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे केली आहे. यावेळी भोर आगार व्यवस्थापकाबरोबर आमदार थोपटे यांनी चर्चा करून वारकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे स्पेशल एसटी सोडावी, अशी सूचना केली.