पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान केले प्रतिपादन
सीडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध परस्परांप्रती विश्वास आणि परस्परांबद्दलच्या आदरावर अवलंबून आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सीडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये आयोजित समारंभात भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. सीडनीत क्वॉड्रोस बॅंक एरिना येथे मोदींचे स्वागत पारंपारिक वेदमंत्राच्या घोषाने केले गेले. या प्रसंगी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले गेले होते.
पूर्वी “कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी’ या 3 “सी’ वर दोन्ही देशांचे संबंध अवलंबून होते. त्यानंतर हे संबंध “डेमोक्रसी, दोस्ती आणि डिस्पोरा’वर अवलंबून राहिले. त्यानंतर या आधारस्तंभांची जागा “एनर्जी, इकॉनॉमी आणि एज्युकेशन’ या 3 “ई’ने घेतली, याही पुढे जाऊन भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध परस्परांप्रती विश्वास आणि परस्परांबद्दलच्या आदरावर अवलंबून राहिले आहेत. मोदी यांनी या विश्वास आणि आदरामागील मुख्य स्रोत भारतीय समुदायच आहे. दोन्ही देशांमधील विश्वास आणि आदर केवळ दोन्ही देशांमधील उच्चस्तरिय संबंधांमुळे निर्माण झाले नसून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांमुळे निर्माण झाले आहेत, असे मोदी म्हणाले. या प्रसंगी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीस हे देखील उपस्थित होते.
दोन्ही देशांमधील रहाणीमान भिन्न असले, तरी क्रिकेट हा एक समान दुवा होता. आता टेनिस आणि सिनेमामुळेही दोन्ही देश जोडले गेले आहेत. आता तर योगामुळे दोन्ही देश जोडले गेले आहेत, असेही मोदी म्हणाले. परमाट्टा येथील लॉर्ड मेयर म्हणून निवडून आलेल्या समीर पांडे यांचाही विशेष उल्लेख मोदींनी केला.
अल्बानीस यांनी यावेळी भारताच्या भेटीच्यावेळचे अनुभव सांगितले. भारताला जाणून घ्यायचे असेल, तर रेल्वे किंवा बसने प्रवास करायला हवा. मार्चमध्ये भारतात गेलो असता गुजरातमधील होळी अनुभवायला मिळाली होती, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
मोदी म्हणजे बॉस – अल्बानीस
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे “द बॉस’ आहेत, अशा शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीस यांनी मोदींचा गौरवाने उल्लेख केला. आपले मनोगतामध्ये अल्बानीस यांनी मोदींची तुलना प्रसिद्ध रॉकस्टार ब्रुस स्प्रिंगस्टीन यांच्याशी केली. स्प्रिंगस्टीन यांनाही “द बॉस’ म्हणूनच संबोधले जात असते. मोदी व्यासपिठावर आल्यावर उपस्थित समुदायाने “भारत माता की जय’, “वंदे मातरम’ आणि “मोदी मोदी’ अशा घोषणांनी त्यांचे स्वागत केले. स्प्रिंगस्टीन यांच्या कार्यक्रमाच्यावेळी देखील उपस्थितांमध्ये एवढा प्रचंड उत्साह आपल्याला बघायला मिळाला नाही. त्यामुळे मोदी हेच खरे “बॉस’ आहेत, असे अल्बानीस म्हणाले.
+++++++++++++++++++