कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथील जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये रोख रकमेसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सत्यासाई कार्तीक यांनी त्यांच्या पथकाला घेऊन छापा टाकला. ही जागा बाळकृष्ण शांताराम शिंदे यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण १० जण ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, गाड्या व मोबाइल फोन असा एकूण ११ लाख ४३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी रहिस मुलाणी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, कर्मचारी नितेश कवडे, रहिस मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.